अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – अहमदनगरमध्ये ‘आंतरजातीय विवाह केल्याने, मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय .यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ती दोन महिन्यांची गर्भवती होती. तिच्याबरोबर असणाऱ्या पतीवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान ,पारनेर तालुक्यातील निघोज येथे ही घटना घडली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली आहे, तर तिचे वडील फरार आहेत.
रुक्मिणी आणि मंगेश रणसिंग यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला होता. मात्र हा आंतरजातीय विवाह असल्याने रुक्मिणीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. त्यामुळे तिच्या माहेरच्यांनी रागातून रुक्मिणीला तिच्या पतीसह अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं.
विवाहानंतर सहा महिन्यांनी मुलगी माहेरी आली होती. तिचा नवरा भेटण्यासाठी तिथे आला होता. मात्र यावेळी मुलीचे वडील, काका आणि मामा यांनी मंगेशला बेदम मारहाण केली. त्यांनतर त्यांना एका खोलीत डांबलं आणि अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं.त्यांनतर दोघांना उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु गंभीर भाजल्याने मुलीचा मृत्यू झाला तर जावयावर उपचार सुरु आहेत.