औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – शहरात सायकलच्या विक्रीत तब्बल 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीने सायकल फॉर चेंज हा उपक्रम शहरात सुरु केला असून याचा परिणाम म्हणून सायकल खरेदीत वाढ झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शहराचे प्रदुषण कमी व्हावे, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतगर्त सायकल फॉर चेंज अभियान देशभर राबवले जात आहे. त्यानुसार शहरात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनने देखील हा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या शहरात सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅकचे काम हाती घेण्यात आले आहे.
या उपक्रमात सायकल असोशिएशन, स्वयसेवी संस्था, एएससीडीसीएलचे अधिकारी आणि शहर पोलिसांनी सहभाग नोंदवला आहे. प्रत्येक अधिका-याने महिन्याच्या पहिल्या दिवशी सायकलने कार्यालयात जावे, असे आवाहन केले आहे. त्याला शहरातील व्यावसायिक, महापालिका अधिका-यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सायकल खरेदीत वाढ झाली आहे. सायकलच्या विक्रीत तब्बल 300 पटीने वाढ झाल्याचे पैठण गेट येथील लुधियाना सायकल मार्टचे निखिल मिसाळ यांनी सांगितले.