नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एटीएममध्ये लवकरच तुम्हाला दोन हजार रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत. सध्या केवळ एका बँकेने तसे करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन बँकेने निर्णय घेतला आहे की, ते एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा ठेवणार नाहीत. या संदर्भात बँकेने आपल्या सर्व शाखांना ही माहिती दिली आहे. इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
इंडियन बँकेने सांगितले की, दोन हजार रुपयांच्या नोटा काढून घेतल्यानंतर ग्राहकांना किरकोळ दुकानात आणि इतर ठिकाणी एक्सचेंज करण्यात अडचण येते. यासंदर्भात बँकेने 17 फेब्रुवारी रोजी एक परिपत्रकही जारी केले आहे. या परिपत्रकात असे म्हटले आहे की, 1 मार्च 2020 पासून इंडियन बँकेच्या एटीएममध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा असलेल्या ऑप्शनला डिसएबल केले जाणार आहे.
मात्र, बँक शाखेत 2000 रुपयांच्या नोटा उपलब्ध होतील, असेही स्पष्ट केले आहे. जर एखादा ग्राहक बँकेतून पैसे काढत असेल तर त्याला 2000 रुपयांच्या नोटा दिल्या जाऊ शकतात. बँकेने सांगितले की, ग्राहक 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी शाखेत येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना एटीएम सेवेत 2000 रुपयांच्या नोटा देण्यात काही अर्थ नाही. हे लक्षात घेऊन बँकेने निर्णय घेतला आहे की, एटीएम मशीनमध्ये 2000 रुपयांच्या नोटा देण्यात येणार नाही.
इतर कोणत्याही बँकेने असा निर्णय घेतला नाही. इंडियन बँकेने एटीएममध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. फायनान्शिअल सॉफ्टवेयर अँड सिस्टम्सचे अध्यक्ष व्ही. बालासुब्रमण्यन यांचा हवाला देत एका माध्यम अहवालात, त्यांना यासंदर्भात कोणतीही माहिती दिली गेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. ही कंपनी देशातील बर्याच बँकांच्या एटीएम सेवा व्यवस्थापित करते.