बहुजननामा ऑनलाईन टीम : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून मुलीच्या वडिल, चुलते, भावडांनी मिळून प्रियकराचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तर मुलीचा वडील फरार असून सांगवी पोलीस शोध घेत आहेत. विराज विलास जगताप (वय 20) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जितेश वसंत जगताप वय 44 यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास हल्लेखोरांच्या मोबाईलवरून जितेश यांना फोन आला. त्यांनी विराजला पिंपळे सौदागर येथे मारले आहे. इथून घेऊन जा अस फोनद्वारे सांगितले. त्यानंतर जितेश, विराजची आई आणि इतर काही जण घटनास्थळी गेले असता, विराज रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. फिर्यादी जितेश हे विराजच्या जवळ गेले. त्यावेळी अगदी शेवटच्या घटका मोजत असलेल्या विराजने सर्व हकीकत सांगितली. मुलीचे वडील, भाऊ यांनी छोट्या हत्ती टेम्पोने माझ्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. मी खाली पडलो, तेव्हा त्यांनी हातात दगड आणि लोखंडी रॉड घेतला होता. ते पाहून घाबरून जिवाच्या आकांताने पळू लागलो. मात्र, धाप लागल्याने खाली पडलो. तेव्हा, त्यांनी रॉड आणि दगडाने मारहाण केली.
माझ्या मुलीवर प्रेम करायची लायकी आहे का तुझी, मुलीवर प्रेम करतो का ? असे म्हणून माझ्या अंगावर थुंकले, असे जितेश यांना विराजने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तत्काळ विराजला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतु, काल दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात खून, अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे अधिक तपास करत आहेत.