बहुजननामा ऑनलाईन – मेरठच्या सरधना येथील कपसाड गावातील एका महिलेने आपल्या पाच वर्षाच्या सावत्र मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. आयुष्यमान अस या पाच वर्षाच्या मुलाचं नाव आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे हत्या करुन तिने मुलाचं शीर बेडमध्ये लपवून ठेवलं होतं.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार पांडेय यांनी याघटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मुलानं सावत्र आईला आपल्या काकासोबत विचित्र अवस्थेत पाहिलं होत. त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तिने मुलाची हत्या केली. तसेच केलेला गुन्हा कोणालाही कळू नये यासाठी तिनं त्याचं डोकं बेडमध्ये ठेवलं. पाच वर्षांचा आयुष्मान त्याचे वडील आणि सावत्र आईसोबत राहत होता. सावत्र आईचं आयुष्मानसोबत वर्तन चांगलं नव्हतं. यादरम्यान, गुरुवारी (ता. १२) आयुष्मान अचानक बेपत्ता झाला. आयुष्यमान अचानक बेपत्ता झाल्यानं कुटुंबीयाची चिंता वाढत होती. सर्व ठिकाणी शोध घेऊन जेव्हा घरातले त्याच्या खोलीत शोधाशोध करु लागले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. येथे त्यांना शीर नसलेला आयुष्मानचा मृतदेह आढळून आला.
पण सावत्र आईने केलेला गुन्हा फार काळ लपून राहिला नाही. सावत्र आईच्या संशयास्पद हालचालींवरून कुटुंबीयांचा तिच्यावरील संशय वाढला. ज्या बेडमध्ये आयुष्मानचं शीर लपवून ठेवलं होतं, त्यावर त्याची आई बसून होती. हा बेड उघडून पाहताच कुटुंबीयांच्या पाया खालची जमीनच सरकली. रक्तानं माखलेलं अवघ्या पाच वर्षांच्या आयुष्यमानचं शीर त्यांना तेथे मिळालं. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना तातडीनं देण्यात आली. घटनास्थळावर दाखल होत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला. तर सावत्र आईला अटक केली. मात्र काका फरारी आहे.