बहुजननामा ऑनलाईन – शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्यांकडून मारहाण व शिवीगाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकारामुळे विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी आक्रमक होत ,मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. माञ राञी उशीरा शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व विद्युत वितरण विभागाचे अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने रात्री बाराच्या सुमारास या प्रकरणावर पडदा पडला.
पुणे ग्रामीण मधील शिक्रापूर पोलीस स्टेशन हे नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असताना दिनांक २६ मार्च २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास महावितरण विभागाचे कर्मचारी एक तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन येथे आले होते बराच वेळ पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत उभे राहण्याची वेळ महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आल्यानंतर काही वेळाने पोलीस कर्मचारी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला .
यावेळेस पोलिस कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला पोलीस ठाण्यात मारहाण केली. या झालेल्या प्रकाराच्या निषेर्धात परिसरातील महावितरणचे कर्मचारी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले त्यांनी त्यांच्या कामावरच बहिष्कार टाकण्याचे जाहीर करत शिक्रापूर पोलीस स्टेशन व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला. जोपर्यंत पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. या वेळी महावितरणचे कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहयाला मिळाले.
शिक्रापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी व महावितरण विभागाचे अधिकारी यांनी चर्चा करत घडलेल्या घटनेबाबत तोडगा काढला मात्र तरीदेखील महावितरणचे कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे मोठा तणाव निर्माण होत होता परंतु अखेर रात्री बाराच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने घडलेल्या घटनेवर पडदा टाकण्यात यश आले. झाल्या प्रकाराबाबत शिक्रापूर पोलिसांनी विद्युत वितरण कर्मचाऱ्यांची दिलगीरी व्यक्त केली. मात्र नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेल्या शिक्रापूर पोलीस स्टेशनकडे वरिष्ठ अधिकारी आता तरी लक्ष देणार का ? असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहे.