मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ऑफिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आता ऑफिसमध्येच कोरोना लस मिळणार आहे. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घेण्याची गरज नाही. तर ऑफिसमध्येच ही लस मिळणार आहे. असा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत केंद्राने अधिसूचना जारी केली आहे.
११ एप्रिल २०२१ पासून ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. यामध्ये खासगी आणि सरकारी कार्यालयात कोरोना लसीकरण केलं जाणार आहे. तर केंद्रीय आरोग्य सचिवांनी जारी केलेल्या या सूचनेनुसार एकावेळी केवळ १०० लोकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर नियमानुसार ४५ पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. तसेच इथेही याच नियमात बसणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस मिळेल. ही लस फक्त संबंधित ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं आहे की, अनेक जण आम्हाला विचारत आहेत ही सर्वांना लसीकरण का केलं जात नाही आहे. याचं कारण म्हणजे या लसीकरण मोहिमेची २ उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे मृत्यूला रोखणं आणि दुसरं म्हणजे आरोग्य सेवा प्रणालीची सुरक्षा. याचा उद्देश असा की ज्यांना कोरोना लस हवी आहे, त्यांंना नाही तर ज्यांना आवश्यकता आहे त्यांना लस देणं आहे. असे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ४५ पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना लस दिली गेली. आता २५ पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींसाठी कोरोना लस उपलब्ध करावी अशी मागणी केली होती. मात्र, केंद्राने सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यास नकार दिला आहे.