बहुजननामा ऑनलाइन – महापालिकेने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणामध्ये केलेले रुग्ण सर्वेक्षण, चाचण्यांची वाढविलेली संख्या व तातडीने, नागरिकांमध्ये स्वसुरक्षिततेबाबत आलेली जागरूकता आणि उपचाराचा बदलण्यात आलेला प्रोटोकॉल यामुळे कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यात यश येत आहे. तसेच रुग्णसंख्याही कमी होत आहे. दुसरीकडे कोरोनाचा विषाणू त्याच्या नैसर्गिक फेजमध्ये बदलत असल्याने काहीअंशी संसर्ग कमी होत असल्याचे दिसत असले तरी तो पुन्हा वाढू शकतो. यासाठी नागरिकांनी यापुढेही सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे सह आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे.
मागील काही दिवसांत कोरोना बाधितांची संख्या तसेच मृत्यूदरही कमी होत आहे. अवघ्या पंधरा दिवसांत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या पाच हजाराने कमी झाल्याने तसेच मृत्यू दरही कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. वावरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरिल माहिती दिली. डॉ. वावरे यांनी सांगितले, की सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहे. याची कारणीमिमांसा करताना केंद्रीय आरोग्य तज्ञांंच्या पथकाने अन्य संसर्गजन्य रोगांच्या अभ्यासातून डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोनाची लाट येईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. इटली, अमेरिकेतही ही लाट जाणवू लागली आहे.
कोरोनासोबत लढा देताना आरोग्य यंत्रणेसोबतच नागरिकांमध्येही मोठ्याप्रमाणावर जागृती झाली आहे. मास्कचा वापर, हातांची स्वच्छता याबाबत नागरिक जागृत झाले आहेत. तसेच मागील सात महिन्यांच्या कालावधीत आरोग्य यंत्रणेला कोरोनाबाधित रुग्ण हाताळणे आणि तसेच उपचारांचा प्रोटोकॉल बर्यापैकी लक्षात आला आहे. महापालिकेच्या माध्यमातून माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच पुर्वीही केलेल्या सर्वेक्षणातून अन्य आजार असलेले नागरिक, प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, स्वॅब चाचण्यांची आणि त्याहूनही संशयितांवर तातडीने उपचार यामुळे संसर्गाला आळा घालणे काही अंशी शक्य झाले आहे.
तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या इशार्यानुसार दुसरी लाट आली तरी महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा तयार आहे. सध्या मोठ्याप्रमाणावर ऑक्सीजन बेडस् आणि व्हेंटीलेटर्स बेडस् रिक्त आहेत. परंतू पुढील विचार करून यामध्ये वाढ करण्याची तयारी सुरूच आहे, असे डॉ. वावरे यांनी नमूद केले.
दसरा, दिवाळीत सुरक्षा बाळगा अन्यथा…
गणेशोत्सवानंतर पुढील दोन आठवड्यांमध्ये शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर आढळले होते. लवकरच दसरा आणि दिवाळी सण येत आहे. सणवाराच्या निमित्ताने होणार्या गाठीभेटीतून मोठ्याप्रमाणावर संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी यापुढेही गर्दी टाळावी, मास्कचा वापर करावा, दिवसांतून पाच ते सहा वेळ हात साबणाने स्वच्छ धुवावेत. लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे.
उपनगरीय भागातील नागरिकांना इशारा
कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरातील मध्यवर्ती दाटीवाटीच्या भागात मोठ्याप्रमाणावर रुग्ण आढळून आले आहेत. सात महिन्यांच्या काळात मध्यवर्ती पेठा आणि झोपडपट्टयांमध्ये अधिक रुग्ण आढळले आहेत. यानंतरच मात्र, उपनगरातील धनकवडी, सिंहगड रोड, वारजे या परिसरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. दुसर्या लाटेमध्ये ज्या परिसरात फारसे रुग्ण आढळले नाहीत, त्या परिसरात अधिक रुग्ण आढळतील अशी शक्यता असल्याचेही डॉ. संजीव वावरे यांनी नमूद केले.