जळगाव : बहुजननामा ऑनलाइन – जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयातील बाथरुमधील नळ चोरीला जाणे चार पोलिसांना भलतेच महागात पडले आहे. ड्युटीवर असताना तेथे चोरी झाल्याने या चौघांना निलंबित करण्यात आले आहे.
हवालदार राजेंद्र भिका चव्हाण, काँस्टेबल प्रवीण शंकर वाघ, राजेंद्र प्रताप दोडे व राहुल अरुण पारधी अशी या चार पोलिसांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी ही कारवाई केली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. एच. ठोंबरे यांचे कार्यालय चोरट्यांनी ३ ऑगस्ट रोजी रात्री फोडले. पण त्यांच्या कार्यालयात चोरण्यासारखे काहीच हाती लागले नाही. कपाटे, ड्रॉव्हरमध्ये रोख रक्कम हाती न लागल्याने चोरट्यांनी बाथरुममधील नळ चोरुन नेले होते.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची चौकशी झाली. त्यात ड्युटीवर असलेल्या ४ कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले होते. या चौकशीच्या आधारे चौघांना निलंबित करण्यात आले आहे.