नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची हेराफेरी करुन सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी एकाला मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.
तापस घोष असे त्याचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोबडे कुटुंबियांची आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित मालमत्ता आहे. त्यावर सीजन लॉन तयार करण्यात आले आहे. या लॉनची मालकी शरद बोबडे यांची आई मुक्ता बोबडे यांच्याकडे आहे. हे लॉन चालविण्यासाठी तापस घोष याच्याकडे १० वर्षापासून देण्यात आले आहे. या लॉनचा हिशोब तापस घोष आणि त्याची पत्नी पहात असत. मुक्ता बोबडे या वयोवृद्ध आणि आजारी आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन घोष याने लॉनच्या भाडेपोटी वसुल केलेल्या रक्कमेत हेराफेरी केली. त्यासाठी त्याने बनावट पावत्या तयार करुन बरीच मोठी रक्कम हडपली. गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरु होता.
हा प्रकार बोबडे कुटुंबियांच्या नुकताच लक्षात आला. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे याची तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घोष याला अटक केली आहे.