बहुजननामा ऑनलाईन- राजस्थानमध्ये एका महिलेला व पुरुषाला आपत्तिजनक अवस्थेत पकडल्यानंतर पंचायतीने तुघलक फरमान ऐकवला. त्या दोघांचे केस कापले आणि त्या पुरुषाला सर्वांसमोर मूत्र पिण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ एका अज्ञात व्यक्तीने रेकॉर्ड केला आणि दोन दिवसानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ही घटना राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील आहे.
नागौर जिल्ह्यातील लाडनू तहसीलच्या निंबी जोधा गावात कालबेलिया समाजातील एका पुरुषासह महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एका महिलेला आणि पुरुषाला बेदम मारहाण केली जात आहे. त्याचवेळी त्यांचे केस कापण्यात आले आणि तोंडही काळे करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्या पुरुषाला बाटलीतून मूत्रही पाजले गेले.
व्हिडिओ समोर आल्यानंतर एसपी डॉ. विकास पाठक आणि एएसपी नितीश आर्य यांनी निंबी जोधा गाठला आणि संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत व्हिडिओमध्ये दिसणार्या लोकांना ओळखले आणि सोमवारी चौकशीसाठी त्यांना पोलिस चौकीत आणले. हा व्हिडिओ २ दिवस आधीचा असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात कोणताही अहवाल दाखल केलेला नाही, परंतु या अमानुष घटनेवर पोलिसांनी दखल घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यावर बोलताना नागौर एसपी म्हणाले की, ही गंभीर बाब लक्षात घेत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.