बहुजननामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनामुक्त राज्य म्हणून मान मिळवणार्या गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाने प्रवेश केला असून सात रुग्ण गोव्यात सापडले आहेत. त्यामुळे गोवेकरांमध्ये दहशत पसरली आहे. संबंधित रूग्ण महाराष्ट्र आणि गुजरामधून आलेले आहेत. दक्षिणेतले एकमेव कोरोनामुक्त राज्य पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या कचाट्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
गोव्यात सात नवे रुग्ण सापडल्याने आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. सात रुग्णांपैकी एक रुग्ण गुजरातहून माल घेऊन ट्रकमधून आला होता. तर मुंबईहून आलेल्या पाच जणांचे कुटुंबही पॉझिटिव्ह सापडले आहे. या पाच जणांना घेऊन येणार्या गाडीचा चालकही पॉझिटिव्ह सापडल्याने गोव्यात आता 7 रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. गोव्यात तीन एप्रिल पासून गेले 39 दिवस एकही रुग्ण पॉझिटिव्ह न सापडल्याने आरोग्य विभाग निवांत होता. दरम्यान, आढळलेल्या रुग्णांवर मडगावच्या कोवीड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रीन झोनची मान्यता मिळाल्यानंतर राज्यअंतर्गत अनेक सुविधांच्या बाबतीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आली होता. मात्र नव्याने आज रुग्ण सापडल्याने लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आली आहे. लॉकडाऊन 3 अंतर्गतचे नियम आता राज्यात लागू होणार आहेत.