मुंबई : बहुजननामा ऑनलाईन : राज्यात कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अकोला आणि अमरावती हे जिल्हे तर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही तशीच स्थिती आहे. महाराष्ट्रातील पॉझिटीव्हिटीचा दरही गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत वाढला आहे. पूर्ण राज्याचा पॉझिटीव्हिटीचा दर हा 8.8 टक्के असून आठवड्याचा पॉझिटीव्हिटीचा दर 7.76 टक्के आहे.
अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्ण पॉझिटीव्हिटीचा दैनंदिन दर हा 32 टक्के असून आठवड्याचा पॉझिटीव्हिटी दर 24 टक्के आहे. अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटीव्हिटीचा दर हा 48 असून आठवड्याचा 35 टक्के आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटीव्हिटी दर 15 टक्के आहे.
कोरोनाचा राज्यातील प्रादुर्भाव वाढत असून आज 3 ते 4 महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येनं 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेता एसएमएसचा ( सोशल डिस्टेंसिंग, मास्क आणि सॅनिटायजर) अवलंब करावा असं ट्विट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
राजेश टोपे यांनी अशी माहिती दिली की, अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे तिथं कंटेन्मेंट झोन जाहीर करून तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.
अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 18, 2021
टोपेंनी असंही सांगितलं की, सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं प्रमाण वाढवावं आणि एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करून चाचण्यांचं प्रमाण वाढवावं आणि पॉझिटीव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा खाली आणावा असे निर्देश संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.
अकोल्यातील बंद कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची वेळ
अकोला जिल्ह्यात सध्या 9 कोविड सेंटर आहेत. परंतु सर्वात जास्त खाटा असलेलं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोविड सेंटर बदं करण्यात आलं आहे. अकोला मेडिकल कॉलेजात आठड्याभरात 6 वार्ड वाढवण्यात आले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. अकोल्यात गुरुवारी संध्याकाळपर्यंत पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 13137 होती. त्यापैकी 1407 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 346 लोकांनी आपला जीव गमावला आहे.