मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील हल्ले कदापिही सहन केले जाणा नाहीत. तसेच असे हल्ले करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलीस आणि नागरिक या दोघांनी स्वयंशिस्त पाळावी, संयम पाळावा असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेने लष्कराची मदत घेतली तशी मदत आपल्या राज्यात घेण्याची वेळ येऊ देऊन नका, ही जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
खरेदीसाठीची गर्दी चिंताजनक
राज्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू आहे. असे असले तरी दूध, फळे, भाजीपाला, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅस इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित होत आहे. तरी देखील खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करावे अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. बारामती आणि वाई शहरात अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस, डॉक्टरांवरील हल्ले चुकीचे
प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याचे समोर आले आहे. ही बेपर्वाई चिंताजनक आहे. वसईत पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. बीडमध्ये पोलिसावर हल्ला तर मालेगावमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे कोरोना विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं कोरोनाचं गाभीर्य ओळखून वर्तन करावे. पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
पत्रकारांनी ऑनलाईन संवाद साधावा
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या पत्रकाराला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित पत्रकारांना संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी ऑनलाईन संवाद साधून सुरक्षितता राखावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.