नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरसची जगभरात दहशत पसरली असून याचा फटका भारत आणि जगातील शेअर बाजाराला बसत आहे. गुरुवारी शेअर बाजार सेन्सेक्समध्ये ३१०० अंकांनी खाली आला असून ३२,६०० वर बंद झाला, तर निफ्टी ९५० अंकांनी घसरत ९,५०० अंकांवर आला आहे.
या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखोंचे नुकसान होत असून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनाही फटका बसला आहे. रिलायन्सचे शेअर आज ५२ आठवड्यांच्या नीचांकावर गेले असताना आज त्यांचे शेअर १०६३ वर बंद होत बाजारा दरम्यान हे १०४८ वर पोहोचले होते. डिसेंबर २०१९ ला रिलायन्सचे शेअर १५३७ रु. असताना ७० दिवसात शेअरच्या किंमतीत घट होत १०६३ वर गेली आहे. ४७५ रु.पर्यंत एका शेअरची किंमत कमी झाली असून कोरोना व्हायरस आणि इतर कारणांमुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये ३० टक्के घसरण झाली आहे.
तसेच शेअर बाजार घसरल्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये मागच्या ७० दिवसात १५.२० अरब डॉलरचे नुकसान झाले असल्यामुळे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा बहुमान मुकेश यांना गमवावा लागला आहे. आता ‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मा हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.