नागपूर, बहुजननामा ऑनलाईन – नागपुरात एका महिलेला प्रसूतीच्या काही मिनिटं आधी करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र तरीही डॉक्टरांनी जीवाची पर्वा न करता या महिलेची प्रसूती केली. मात्र यांनतर प्रशासनाने ऑपरेशन थिएटरचे निर्जंतुकीकरण केले. तसेच ज्या डॉक्टरांनी या महिलेची प्रसूती केली त्यांना आणि काही कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. तसेच बाळाला त्यांच्या नातलगांकडे सोपवून त्यांना सुद्धा क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तसेच काही दिवसातच या बाळाची सुद्धा तपासणी करण्यात येणार आहे. सध्या महिलेला कोरोना कक्षात हलवण्यात आले आहे. हि २८ वर्षीय महिला अमरावतीची असून सातवा महिना सुरु असताना आपल्या आईकडे नागपूरच्या मोमीनपूरा परिसरात बाळंतपणासाठी आली होती. नातेवाईकांनी प्रसूतीसाठी तिला मेयो रुग्णालयात दाखल केलं होतं. नागपूरच्या सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा परिसरात जास्त करोनाबाधित आढळल्याने रुग्णालय प्रशासनाने महिलेच्या घशातील नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यानंतर तिला स्वतंत्र व्यवस्था करून दाखल केले गेले.
बुधवारी तिला करोना झाला असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. संबंधित महिलेचे बाळ सध्या नातलगांकडे आहे. बाळाला कोरोनाची लागण झाली कि नाही हे तपासात निष्पन्न होणे बाकी आहे. परंतु बाळ कोरोना पॉसिटीव्ह निघाले तर परिस्थिती हि बिकट होऊ शकते.