बहुजननामा ऑनलाईन – जगभरात कोरोनाने थैमान घातले असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून भयावह स्थिती निर्माण झाली आहे. ब्राझीलमध्ये 1 दिवसांत तब्बल 4 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेह दफन करण्यासाठी कब्रिस्तानमध्ये आता जागाच शिल्लक राहिलेली नाही. दरम्यान ब्राझीलमध्ये परिस्थिती गंभीर होतानाही राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी लॉकडाऊन लागू करण्यासाठी नकार दिला आहे. येत्या काही दिवसांत मृतांचा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ब्राझीलमध्ये सापडत आहेत. तर सर्वाधिक मृत्यू देखील येथेच होत आहेत. येथील अनेक रुग्णालयांची क्षमता देखील संपुष्टात आली आहे. 26 पैकी 16 राज्यांमध्ये आयसीयू बेड्सची कमतरता निर्माण झाली आहे. 90 टक्के आयसीयू बेड्स रुग्णांनी व्यापले आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये काल एका दिवसात 4,195 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ब्राझीलमध्ये कोरोना बळींची संख्या ही 3,37,000 वर गेली आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी देशात कोरोनाचे 86,979 नवीन रुग्ण समोर आले आहेत. देशातील केवळ 3 टक्के लोकांना लसीकरणाचे दोन्ही डोस मिळाले आहेत. यामुळे चिंता वाढली आहे. धीम्या गतीने लसीकरण होत असल्याने परिस्थिती अधिक भीषण झाली आहे. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने परराष्ट्र मंत्री एर्नेस्टो अरेजो यांनी राजीनामा दिला आहे. कोरोनामुळे भयावह परिस्थिती असून कर्मचाऱ्यांकडून जुने सांगाडे बाहेर काढण्यात येत आहेत आणि त्याठिकाणी नवीन मृतदेहांसाठी जागा तयार केली जात आहे. गेल्या एका आठवड्यात ब्राझीलमध्ये जवळपास 60 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.