पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील दोन दिवसांत पुण्यामध्ये दिलासादायक परिस्थिती होती. सलग दोन दिवस बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र आज (बुधवार) कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पुण्यामध्ये 4 हजार 458 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यामध्ये रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. दिवसभरात पुण्यामध्ये 43 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 69 हजार 343 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 32 रुग्ण शहरातील आहेत तर 11 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 5 हजार 302 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 3 हजार 374 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 30 हजार 183 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (बुधवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 16 हजार 446 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 33 हजार 858 इतकी आहे. त्यापैकी 799 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 5 लाख 25 हजार 806 रुग्णांपैकी 4 लाख 56 हजार 948 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 59 हजार 32 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 826 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.87 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.90 टक्के आहे.