पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहर व जिल्ह्यात सध्या अत्यंत वेगाने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या १० दिवसात केवळ पुणे शहरात तब्बल ४३ हजार ६०९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक ८१ हजार ५१४ सक्रीय रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहेत. गेल्या १० दिवसात पुणे शहरात सरासरी दररोज ४ हजार ३६० रुग्ण आढळून आले आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त म्हणून पुणे जिल्ह्याचे नाव समोर आले आहे. गेल्या काही दिवसात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात वेगाने कोरोनाचा प्रसार होताना दिसून येत आहे. पुणे शहराबरोबरच जिल्ह्यात सध्या दररोज आढळणार्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांहून अधिक दिसत आहे.
पुणे शहरात सध्या तब्बल ४४ हजार ८२२ सक्रीय रुग्ण असून एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ लाखांवर पोहचली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत एकूण २ लाख ९९ हजार ७२१ कोरोना रुग्ण आढळून आले होते. पुणे शहरात २९ मार्च रोजी २५४७ नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर दररोज नवीन रुग्णांची संख्या वाढत गेली. ५ एप्रिल रोजी तब्बल ७ हजार ७७ नवीन रुग्ण एका दिवशी आढळून आले होते. गेल्या १० दिवसात २८ हजार ६०३ रुग्ण बरे झाले आहेत. नव्या कोरोना रुग्णांच्या मानाने बरे होणार्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने सर्व आरोग्य यंत्रणांवर ताण वाढत जात आहे.
याच १० दिवसात ३९४ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने सायंकाळी ६ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूव्यतिरिक्त अन्य सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. शहरात सध्या कोरोना चाचण्या १७ ते २० हजारांपर्यंत केल्या जात आहे. चाचणी वाढविल्या असल्या तरी पॉझिटिव्ही रेट ३२ टक्क्यांवर पोहचला आहे. यापूर्वी तो जास्तीत जास्त २४ टक्क्यांपर्यंत गेला होता. त्यापेक्षा कितीतरी अधिक सध्या पॉझिटिव्ही रेट दिसून येत आहे.
पुणे शहरात दररोज आढळून आलेले नवीन कोरोना रुग्ण
६ एप्रिल – ५६००
५ एप्रिल – ७०७७
४ एप्रिल – ६२२५
३ एप्रिल – ५७२०
२ एप्रिल – ४६५३
१ एप्रिल – ४१०३
३१ मार्च – ४४५८
३० मार्च – ३२२६
२९ मार्च – २५४७
………….
एकूण – ४३६०९