बहुजननामा ऑनलाईन
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना काळात दिवसरात्र झडटणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्माचारी, पोलीस स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार या कोविड योद्ध्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना काळात सेवा देताना मृत्यू झालेल्या कोविड योद्ध्यांना शहिदांचा दर्जा द्यावा, तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सभागृहात केली.
विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या शोक प्रस्तावावर सहवेदना मांडताना दरेकर यांनी ही मागणी केली. दरेकर पुढे म्हणाले, आपली काहीही चूक नसताना, कोरोनाग्रस्तांना सेवा देताना, मदत करताना ज्यांचे निधन झाले, असे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय वाऱ्यावर आले आहे. त्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, असे स्पष्ट केले. या कोविड योद्ध्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबातील कमवता व्यक्ती गमावल्यामुळे त्या कुटुंबातील एका सदस्याला संबंधित मृत व्यक्तीच्या ठिकाणी शासकीय नोकरीत सामावून घेण्याची विनंती देखील देरेकर यांनी यावेळी केली.
पांडुरंग रायकर यांना 50 लाखाचा विमा द्या
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रायकर यांच्या कुटुंबियांना 50 लाखांचा विमा त्वरित द्यावा अशी मागणी देखील प्रविण दरेकर यांनी केली आहे.