नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन आणि सर्व उपाय असूनही कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे. सरकारने ३ मे रोजी संपणारा लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला आहे, पण कोरोनाचा प्रसार कमी होताना दिसत नाही. आता या प्राणघातक विषाणूने कोरोना कमांडोजला देखील संक्रमित करण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनंतर आता केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) अनेक सैनिकदेखील कोरोना संक्रमित आढळले असून शुक्रवारी सीआरपीएफच्या १२ जवानांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची पुष्टी झाली. यासोबत कोरोना विषाणूने संक्रमित सीआरपीएफ जवानांची संख्या १२२ वर पोहोचली आहे. १५० सैनिकांचा तपास अहवाल येणे बाकी आहे.
सर्व सीआरपीएफ ३१ बटालियनचे आहेत. ही बटालियन राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या मयूर विहार फेज ३ मध्ये तैनात आहे. विशेष म्हणजे सीआरपीएफच्या ३१ बटालियनचे सहायक उपनिरीक्षक मोहम्मद इकराम हुसेन यांचे २८ एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झाले. इकराम यांचा सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोना व्हायरस निमलष्करी दलापर्यंत पोहोचल्यामुळे खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही ५५ वर्षीय हुसेन यांच्या मृत्यूबद्दल ट्विट करून दुःख व्यक्त केले होते. देशातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.
एनपी न्यूज 24 नेटवर्क