पटणा : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रसार अधिकच वाढला असून दिवसागणिक येणारी कोरोना बाधितांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्राण देखील वाढले आहे. कोरोनाशी झुंजत असलेले बिहारमधील भाजप आमदार सुनिल कुमार सिंह (वय-66) यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. कोरोनामुळे बिहारमध्ये कोणत्याही मोठ्या नेत्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सुनिल कुमार सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. सुनील कुमार सिंह यांच्यावर पटणा येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मृत्यूची माहिती देताना नोडल अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले की, सुनिल कुमार सिंह यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना शुगर आणि हायपरटेंशनचा त्रास होता. अखेरच्या काळात त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते.
सुनिल कुमार हे दरभंगामधील स्थानिक मततदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना 13 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांत बिहारमध्ये कोरोना प्रसार अधिक झाला असून अनेक नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मंत्री विनोद कुमार सिंह, भाजप आमदार जिबेश कुमार मिश्रा, काँग्रेस आमदार आनंद शंकर सिंह, राजद आमदार शाहनवाझ आलम आणि जेडीयू आमदार खालिद अन्वर यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.