बिजिंग : वृत्तसंस्था – एका लक्षणे नसलेल्या महिलेने तब्बल 71 लोकांना कोरोना व्हायरसने संक्रमित केले आहे. परंतु, महिलेने स्वत: खुप काळजी घेतली होती, तरीसुद्धा व्हायरस पसरला. चीनच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (सीडीसी) ने या घटनेचा अभ्यास केला आहे. चीनी सीडीसीचे म्हणणे आहे की, महिलेने सर्वकाही ठिक केले. प्रवासावरून आल्यानंतर तिने स्वत:ला आपल्या अपार्टमेंटमध्ये क्वारंटाईन केले. तिच्यात कोणतीही लक्षणे नव्हती. महिला अपार्टमेंटमध्ये जाताना लिफ्टमध्ये सुद्धा एकटी होती. अभ्यासानुसार, महिला अमेरिकेचा प्रवास करून 19 मार्चला आपल्या घरी म्हणजेच चीनच्या हेलोंगजिआंगमध्ये परतली होती. तपासणीत ती कोरोना निगेटिव्ह आढळली होती, तरीसुद्धा तिने स्वत:ला घरात बंद करून घेतले होते.
परंतु, लिफ्टचा तिने वापर केल्यानंतर थोड्यावेळातच तिच्या शेजार्याने त्याच लिफ्टचा वापर केला होता. यानंतर शेजार्याची आई आणि तिला भेटण्यासाठी आलेला बॉयफ्रेंड हे दोघे एका पार्टीत सहभागी झाले होते. यानंतर 2 एप्रिलला त्याच पार्टीत सहभागी एका व्यक्तीला स्ट्रोक झाला. तपासात पार्टीत सहभागी झालेल्या लोकांचे कोणत्याही संक्रमित व्यक्तीशी कनेक्शन सापडले नाही. नंतर संशोधकांना आढळले की, ज्या लिफ्टमध्ये अमेरिकेहून परतलेली महिला होती, त्याच लिफ्टचा वापर केल्याने शेजारी संक्रमित झाला. शेजार्यामुळे त्याची आई संक्रमित झाली, शिवाय या महिलेचा बॉय फ्रेंड संक्रमित झाला.
नंतर ग्रुपचा एक सदस्य जेव्हा स्ट्रोकच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा त्याने 28 लोकांना संक्रमित केले. नंतर त्यास दुसर्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जेथे त्याने आणखी 20 लोकांना संक्रमित केले. त्याची देखभाल करणारी दोन्ही मुले सुद्धा संक्रमित झाली. नंतर तपासकर्त्यांना समजले की, एक महिला प्रवासातून परतली आहे, तेव्हा दुसर्यांदा तिची टेस्ट केली. अमेरिकेहून परतलेली ती महिला जी अगोदर निगेटिव्ह आढळली होती, यावेळी ती कोरोना व्हायरस अँटीबॉडी टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळली. म्हणजे तिला अगोदर कोरोना झाला होता.संशोधकांनी अभ्यासाच्या निष्कर्षात लिहिले की, आम्हाला वाटते की, लक्षणे नसलेली महिला लिफ्टने आली, त्याच लिफ्टच्या लिफ्टच्या पृष्ठभागाच्या संपर्कात आल्याने शेजारी पॉझिटिव्ह झाला. यातून हे समजते की, कशाप्रकारे लक्षणे नसलेल्या रूग्णाकडून मोठ्याप्रमाणात व्हायरस पसरू शकतो.