नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, सफाई कामगार रात्रंदिवस जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहेत. अनेकजण स्वत:च्या जीवाची काळजी न करता कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने तर कोरोनाग्रस्त रुग्णाला वाचवण्यासाठी पीपीई किट काढून स्वत:चा जीव धोक्यात घातल्याचे दिसून आले आहे. संबंधित डॉक्टरांना खबरदारी म्हणून 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. डॉ. जाहिद अब्दुल माजीद असे या डॉक्टरांचे नाव आहे.
एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये कोरोनाबाधिताला शिफ्ट करताना त्यांनी स्वत:चा सुरक्षा मास्क उतरवला असल्याचे दिसून आले आहे. एका रुग्णाला ट्रॉमा सेंटरमध्ये शिफ्ट करण्याबाबतचा त्यांना फोन आला. त्यावेळी माजीद यांना ‘रोजा’ सोडायचा होता. पण, रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली. त्या रुग्णाला एम्सच्या मुख्य इमारतीतून कोरोनाग्रस्तांसाठीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये शिफ्ट करण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेले जात होते.
त्यावेळी, रुग्णाला कृत्रिम श्वासोश्वास पुरवणार्या नळीद्वारे श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं डॉ. माजीद यांच्या लक्षात आले. लगेचच माजीद यांनी ती नळी पुन्हा व्यवस्थित लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी रुग्णवाहिकेत पुरेसा प्रकाश नसल्याने आणि फेस शील्ड व प्रोटेक्टिव गॉगल घातल्यामुळे निट दिसत नव्हते. पण रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे वेळ वाया न घालवता त्यांनी फेस शील्ड आणि प्रोटेक्टिव गॉगल हटवले व ऑक्सिजन पुरवठा देणारी नळी व्यवस्थित लावली. त्याच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.