नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बंगळुरु येथे एका पार्टीत कोरोना व्हायरसचा उद्रेक पाहिला मिळाला. तर एका अपार्टमेंटमध्ये झालेल्या पार्टीत उपस्थित असलेल्या अनेकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यातील 103 जणांचा कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याची ही गेल्या काही दिवसांतील पहिलीच घटना आहे. या रुग्णवाढीचे प्रमुख कारण म्हणजे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन.
सुरुवातीच्या काळात कोरोना व्हायरसचा मोठा उद्रेक झाला होता. त्यावेळी अनेकांनी याकडे गांभीर्याने पाहता कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन केले होते. यामध्ये मास्कचा वापर, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिंग यावर भर दिला जात होता. मात्र, कोरोना लस आल्यानंतर आणि रुग्णसंख्या कमी होत असल्याने या सर्व नियमांकडे नागरिकांकडून डोळेझाक केली जात आहे. त्यामुळेच आता सामूहिकरित्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याची प्रकरणं समोर येत आहे.
कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करा
सध्या कोरोनावरील लस ही फक्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वॉरियर्स यांना दिली जात आहे. म्हणजेच सर्वसामान्यांसाठी लस अद्याप प्रतिक्षेतच आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. त्याबाबतचे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे.
40 विद्यार्थीही कोरोनाबाधित
बंगळुरुतील मंजुश्री कॉलेज ऑफ नर्सिंगच्या 210 विद्यार्थ्यांपैकी 40 विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यातील काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.