औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाला असतानाच 1 फेब्रुवारीपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मराठवाड्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमधून ही बाब समोर आली आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हिंगोली, परभणी, जिल्हाधिकाऱ्यांसह औरंगाबाद, बीड, नांदेड येथील अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघडणी केली. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये सुनिल केंद्रेकर अधिकाऱ्यांना सांगत आहेत की, निष्काळजीपणाने काम करुन नका, झोपा काढता काय, त्याच त्याच सूचना द्यायला लावू नका, कामाला लागा, अशा शब्दात केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
सुनिल केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना सुनावल्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी मराठवाड्यातील अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्याचे ऐकायला मिळत आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मधील संवाद त्यांच्या शब्दात
एक-एक मंगलकार्यालयावर रेड करा
ऑडिओ क्लिपमध्ये अधिकाऱ्यांशी संवाद साधताना केंद्रेकर यांनी एक-एक मंगल कार्यालयांवर रेड करा, त्यांना नोटीस द्या आणि फाईन लावायला सुरुवात करा. जर तिथे विनामास्क परवानगी पेक्षा जास्त लोक आढळले, तर कारवाई करा. पहिली नोटीस गेली पाहिजे. दंड लावला पाहिजे, पोलीस केस करु म्हणून नोटीसमध्ये उल्लेख करावा. दुसऱ्यावेळी सापडले तर गुन्हे दाखल करा व 15 दिवसांसाठी सील करा.
कोचिंग क्लासेसवर रेड करा
कोचिंग क्लासेसवर जाऊन रेड करा. दंड करा. मुलांनी मास्क लावले की नाही, सॅनिटायझरची व्यवस्था आहे की नाही याची पाहणी करा, सगळ्यांना नोटीस द्या. दुसऱ्यावेळी सापडले तर कोचिंग क्लास सील करावे लागतील. बाकीचे क्लोज स्पेसेस आहेत तेथेही ताबडतोब कारवाई करा, हे अर्जंट आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले, म्हणाले सगळे झोपा काढत आहेत
हिंगोली, परभणी जिल्हाधिकाऱ्यांना माझी सूचना आहे. तुमच्याकडचे फीडबॅक येत आहेत. मोठमोठी लग्न होत आहेत आणि काहीही कारवाई होत नाही. औरंगाबादमध्ये तिच परिस्थिती आहे. लग्न होत आहेत आणि सगळे झोपा काढत आहेत. मला ही कारवाई तत्काळ पाहिजे.
खासगी डॉक्टरांना वॉर्निंग द्या
जे खासगी डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे सर्दी, खोकला, ताप, फ्ल्यू स्वरुपातील लक्षणे घेऊन रुग्ण जातात. हे डॉक्टर त्यांना तपासणी करण्यास सांगत नाहीत. सगळ्या डॉक्टरांना लिखित स्वरुपात वॉर्निग द्या, कोविड स्वरुपातील लक्षणे असतील तर टेस्ट करणे बंधनकारक आहे.
विनामास्क फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल होतील
लोक विनामास्क फिरली तर दंड केला जाईल. काही ठिकाणी रुग्ण, सर्दी, फ्ल्यू स्वरुपातील लोक विनाप्रोटेक्शन फिरले तर त्यांच्यावर साथरोग कायद्याखाली स्प्रिडिंग केले म्हणून गुन्हे दाखल होतील.
दहावेळा सांगून झाले, काय प्रॉब्लेम आहे
परभणीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अत्यंत कमी आहे. मला माहीत नाही परभणीचा काय प्रॉब्लेम आहे. परभणी जिल्हाधिकारी यांना दहावेळा ही सांगून झाले. शेवटी आहे तिथेच आहे. कृपा करुन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कुठत्याही परिस्थितीत कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांचा 20 च्या खाली आला नाही पाहिजे.
काल कौतुक झाले, पण…
हिंगोली आणि बीड यांचे ट्रेसिंगसुद्धा कमी आहे. हिंगोली जिल्हाधिकारी यांनी दक्षता घ्यावी. कामाचे काल कौतुक झाले, पण टेस्टिंग जर नसेल तर चालणार नाही. टेस्टिंग झाले पाहिजे.