बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीनंतर १६ जानेवारी पासून देशभरात लसीकरणाला सुरु होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी दोन टप्प्यात(Corona Vaccine) करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी तब्बल २ लाख २३ हजार कोरोना प्रतिबंध डोसची गरज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. तसेच पुणे जिल्ह्याला नक्की किती डोस मिळतील हे बुधवारी मुंबईत होणाऱ्या आढावा बैठकीनंतर स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोरोना लसीकरणासाठीची तयारी पूर्ण झाली असून, प्रथम सरकारी व खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना लस टोचवण्यात येणार आहे. त्यात शहर व जिल्ह्यातील तब्बल १ लाख १० हजार ४३४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात २३, पुणे महापालिका क्षेत्रात १५ तर पिंपरी चिंचवड महापालिका भागात १६ अशा एकूण ५५ केंद्राचा समावेश आहे.
कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी २८ दिवसांच्या फरकाने दोन डोस देण्याचे सरकारचे निर्देश आहे. त्यात पहिल्या टप्प्यात शहर, ग्रामीण भागातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आजार जडलेल्या व वयोवृद्धांना प्राधान्य दिले जाईल.
>> प्रत्येक आरोग्य कर्मचा-याला दोन डोस प्रमाणे अपेक्षित लस डोस : २ लाख २३ हजार ७७
>> जिल्ह्यातील एकूण लसीकरण केंद्र : ५५
>> सरकारी व खासगी आरोग्य कर्मचारी : १ लाख १० हजार ४३४
>> लसीकरणासाठी नियुक्त कर्मचारी : २ हजार ५४५