मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईतील नागरिकांचे लसीकरण सुरळीत होण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी महानगरापालिका प्रशासनाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
1. सोमवार दिनांक 24 मे ते बुधवार दि. 26 मे या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये लसीकरणासाठी थेट येण्याची मुभा देण्यात आली आहे.
यामध्ये कोव्हिशिल्ड लसीसाठी –
– 60 वर्षे व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या मात्रेचे लाभार्थी
– 60 वर्षे व 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील कोव्हिशिल्ड लसीच्या दुसऱ्या मात्रेचे लाभार्थी
– आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील (फ्रंटलाईन) इतर कर्मचारी यांच्यातील दुसऱ्या मात्रेचे लाभार्थी
– 45 वर्ष व त्यावरील वयोगटातील दुसऱ्या मात्रेचे पात्र लाभार्थी. हे सर्वजण लस घेऊ शकतात. तसेच, कोव्हॅक्सीन लसीचा विचार करता, सर्व वयोगटातील, दुसऱ्या मात्रेसाठी पात्र लाभार्थी येऊ शकतात
2. दिनांक 27 मे ते 29 मे या तीन दिवासांच्या कालावधीत प्रत्येक केंद्रावर 100 टक्के लसीकरण हे कोविन प्रणालीवर नोंदणी केल्यानंतरच तसेच लसीकरण केंद्र व वेळ निश्चित झाल्यानंतरच (स्लॉट बुकिंग) करण्यात येईल.
3. रविवार दि.30 मे रोजी लसीकरण क्रार्यक्रम बंद राहिला.
आठवड्यातील लसीकरणाच्या या नियोजनामध्ये अनपेक्षित कारणांनी काही बदल करावा लागल्यास त्याबाबतची पूर्वसूचना एक दिवस आगोदर प्रसारमाध्यमं आणि समाज माध्यमं यांच्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांपर्यंत पोहचवली जाईल.
दरम्यान, केंद्र सरकारने नुकतेच केलेल्या सुचनेनुसार, कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रांमध्ये पूर्वीच्या 6 ते 8 आठवड्यांऐंवजी आता 12 ते 16 आठवड्यांचे अंतर असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या मात्रेनंतर 84 दिवसांच्या अंतराने दुसरी मात्रा दिली जाणार आहे.
ही बाब लक्षात घेता, दिनांक 1 मार्च पासून कार्यान्वित झालेल्या लसीकरण टप्प्यातील 60 व 60 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांनी तसेच आरोग्य कर्मचारी व आघाडीवर काम करणारे इतर कर्मचारी यांनी दिनांक 1 मार्च 2021 रोजी कोव्हिशिल्ड लसीची पहिला मात्रा घेतली असल्यास त्यांना, दिनांक 24 मे 2021 किंवा 84 दिवसानंतर दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.