मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मानखुर्द येथील गतीमंद मुलांचे वसतिगृह असलेल्या ’चिल्ड्रन्स होम’ सोसायटीमधील 30 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मोठ्या संख्येने गतीमंत मुलांना कोरोनाची लागण होणे ही चिंतेची बाब आहे. या चिल्ड्रेन्स होममध्ये कोरोनाचा शिरकाव नेमका कसा झाला ? याचा शोध घेण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.
मानखुर्दमधील गतीमंद मुलांना नवी उभारी देणारे हक्काचे घर आहे. या ठिकाणी एकूण 268 मुले राहतात. दोन आठवड्यांपूर्वी चिल्ड्रन्स होममध्ये अचानक काही मुलांना खोकला सुरु झाला. चिल्ड्रन्स होम व्यवस्थापनाने मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधून ही माहिती दिली. यानंतर मुंबई महानगरपालिकेने चिल्ड्रन्स होम सोसायटीमध्ये फिवर कॅम्पचे आयोजन केले. या फिवर कॅम्पमध्ये मुलांची स्क्रीनिंग करण्यात आली आणि त्यानंतर आलेला अहवाल धक्कादायक होता. स्क्रीनिंगनंतर 84 मुलांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. यात 25 मुले आणि 5 मुलींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यापैकी दोन मुलांना इतर आजार असल्याने त्यांना सायन रुग्णालयात उपचाराकरता हलवले आहे.
तर इतर 27 मुले बीकेसी कोविड सेंटर येथे दाखल केली आहेत. मुंबई महापालिकेकडून या चिल्ड्रन होमचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. आजुबाजूच्या परिसरातील रहिवासी आणि इतर वसतीगृहांतही स्क्रीनिंग केली जात आहे. संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरणही करण्यात आले आहे. दरम्यान, चिल्ड्रन्स होम सोसायटीमध्ये कोरोनाचा फैलाव नेमका कसा झाला, मुलांची काळजी घेण्यात हलगर्जीपणा झाला का? हे प्रश्न आता समोर येतात. याची चौकशी करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे.