बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला असून हॉलीवूड अभिनेते,गायक, आंतरराष्टीय राजकीय व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे सुद्धा मागील काही दिवसांपासून कोरोनाशी लढा देत आहेत. जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे सोमवारी त्यांना रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जॉन्सन यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.
पंतप्रधान जॉन्सन यांनी कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर स्वतःला विलग करून घेतले होत. तेथूनच ते संपूर्ण काम बघत होते. मात्र, ताप कमी होत नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतरही उपचार सुरू असताना जॉन्सन यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाली. त्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. जॉन्सन यांच्यावर सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत.
कोरोना विषाणूची जगभरातील अनेक नामवंत व्यक्तींनाही लागण होत आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला असून, काही जण त्यावर मात करून बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येने सगळ्यांच्या चिंतेत भर पडत असताना 27 मार्च रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना करोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते.
त्यांनी स्वतः फेसबुकवरून याची माहिती दिली होती.