बहुजननामा ऑनलाईन टीम – दहशतवाद्यांना मदत केल्याच्या प्रकरणात जम्मू-काश्मीर पोलिस दलातील डीएसपी देविंदर सिंग यांना नुकतेच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी डीएसपी सिंग यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले होते. सिंग याला NIA ने अटक करून दोषारोपत्र दाखल केले आहे. दरम्यान दोन सरकारी शिक्षकांनाही नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. बशीर अहमद आणि मोहम्मद युसुफ अशी त्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, जानेवारी 2020 मध्ये डीएसपी देविंदर सिंग यांना दहशतवाद्यांसह अटक केली होती. सिंग हे दहशतवाद्यांना एका खासगी वाहनातून घेऊन जात होते. दहशतवाद्यांना काश्मीरमधून बाहेर काढण्याचा कट होता. परंतु एका गुप्त माहितीच्या आधारे त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला निलंबत केले होते. घटनास्थळावर हिजबुल कमांडर नावेद बाबू याच्यासह एकूण चौघांना अटक केली आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएला दिला गेला. तपासा दरम्यान बर्याच गोष्टी समोर आल्या. सिंग हे ब-याच दिवसांपासून दहशतवाद्यासाठी काम करत असल्याचे समोर आले होते. ते श्रीनगर विमानतळावरही तैनात होते. अतिरेक्यांविरोधात कारवाई सुरू होती. त्यावेळी दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले गेले आहे. तपासणीनंतर हे प्रकरण कोर्टाकडे पाठवले होते. 19 जून 2020 रोजी एका खटल्यात त्यांना कोर्टाने जामीनही मंजूर केला होता. त्यानंतरही तो तुरूंगात होता. कारण दुसर्या प्रकरणात जामीन मिळाला नव्हता. यानंतर आता यंदा 16 एप्रिल रोजी त्यांनी न्यायालयात अर्ज केला. यात त्यांनी आपला खटला श्रीनगर कोर्टात हलविण्यास सांगितले होते. पण त्यांची याचिका कोर्टाने फेटाळली आहे.