मुंबई : बहुजननामा – आगामी विधानसभा निवडणूक विचारात घेता वंचितने काँग्रेसला 40 जागांची ऑफर दिली होती. परंतु यानंतर आता काँग्रेसने वंचितला एक ऑफर दिली आहे. निवडणुकीसाठी काँग्रेसने एक नवीन फॉर्म्युला तयार केला आहे. यानुसार, 96 जागा काँग्रेस, 96 जागा राष्ट्रवादीसाठी तर वंचितसाठी 96 जागांची ऑफर दिली गेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र ही ऑफर धुडकावली आहे.
आघाडीत बिघाडी नको यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक बैठका घेतल्या. नुकतीच एक बैठक पार पडली ज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने तिसऱ्या आघाडीसाठी 96 जागांचा नवीन फॉर्म्युला तयार केला आहे. सदर जागांची ऑफर प्रकाश आंबेडकरांनाही देण्यात आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रकाश आंबेडकरांनी ही ऑफर नाकारली आहे. तिसऱ्या आघाडीत मित्र पक्षांसह वंचितला 96 जागांचा फॉर्म्युला आंबेडकरांना मान्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने मित्र पक्षांना आपल्या कोट्यातील जागा द्याव्यात अशी आंबेडकरांची भूमिक आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार पक्षातून बाहेर पडत आहेत. निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे आणखी किती आमदार पक्ष सोडतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे असे चिन्ह दिसत आहे की, ऐन निवडणुकीत पक्षांना उमेदवार शोधावा लागणार आहे. त्यामुळे ही कडकी ओळखूनच अधिकाधिक जागा मिळवण्याच्या हेतूनेच प्रकाश आंबेडकरांचे प्रयत्न सुरु आहेत.