बहुजननामा ऑनलाईन
अभिनेय ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या तमिळनाडूमधील काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2014 पासून त्या काँग्रेस नेत्या म्हणून काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाचं वृत्त फेटाळून लावलं होतं. मात्र आता पुन्हा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्या आता दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत.
जेव्हा खुशबू यांना विचारण्यात आलं की, काँग्रेस सोडणार का ? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, याबाबत मी काहीही बोलू इच्छित नाही. त्यामुळं आता त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. तमिळनाडूमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथील राजकीय घडामोंडींना वेग येताना दिसत आहे. असं असतानाच खुशबू सुंदर यांच्या रुपानं दक्षिण राजकीय मैदानात भाजप जोमानं उतरण्यासाठी उत्सुक आहे. 2 दिवसांपूर्वीचं त्यांचं ट्विट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.
https://twitter.com/
खुशबू सुंदर यांनी अभिनयातून राजकारणात एन्ट्री केली होती. सर्वप्रथम त्यांनी 2010 साली डीएमके पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी डीएमके सत्ताधारी पक्ष होता. मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असून जनसेवा करायला मला आवडतं, माझा निर्णय योग्य आहे असं त्या म्हणाल्या होत्या.
मात्र 4 वर्षांनंतर काग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांनी 2014 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेस पक्षच देशातील नागरिकांचं भलं करू शकतो, काँग्रेसमध्ये आल्यानंतर मला घरी आल्याचा आनंद होत आहे. असं त्या म्हणाल्या होत्या. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं खुशबू यांना तिकीट नाकारलं. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस आणि डीएमके आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. त्यामुळं आता खुशबू भाजपचं कमळ हाती घेणार का ? याकडे तमिळनाडूमधील बड्या नेत्यांचं लक्ष लागलं आहे. ट्विटरवरही खुशबू सुंदर हा हॅशटॅग ट्रेंड करताना दिसत आहे.