बहुजननामा ऑनलाईन – लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभानिमित्त ३० जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान बालगंधर्व येथे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुनील भंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुनील महाजन, राजेश पांडे, निकीता मोघे आदी उपस्थित होते.
भंडगे म्हणाले की, बालगंधर्व येथे छायाचित्र प्रदर्शन, ग्रंथदिंडी, कविसंमेलन, परिसंवाद अशा १६ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. छायाचित्र आणि पुस्तक प्रदर्शनाचे उद्धाटन ३० जुलैला सकाळी ११ वाजता दादा इधाते यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर ३ वाजता ‘वारणेचा वाघ’ हा चित्रपट दाखविला जाणार आहे. बुधवार ३१ जुलै सकाळी ११ वाजता अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडी सुरु होणार आहे.
भंडगे पुढे म्हणाले की, १ ऑगस्टला सकाळी ११ वाजता शिल्पकार प्रमोद कांबळे हे अण्णा भाऊ साठे यांचे शिल्प साकारणार आहे. १ वाजता रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. यानंतर सायंकाळी ५ वाजता ‘लोकशाहीर’ पुरस्कार शाहीर हेमंत मावळे यांना देण्यात येणार आहे. ‘रमाई मातृशक्ती’ पुरस्कार कचरादूत स्वाती गायकवाड यांना प्रदान करण्यात येणार आहे.