परभणी : बहुजननामा ऑनलाईन – सांस्कृतिक दहशतवादाने देशात अघोषित आणीबाणी सदृश्य भयावह परिस्थिती निर्माण करून संविधानिक मूल्यांची पायमल्ली सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, शोषित वंचित बहुजनांनी संघटितपणे सांस्कृतिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी यांनी व्यक्त केले.
येथील विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने सांस्कृतिक दहशतवाद विरोधी सत्यशोधक विचार परिषद बी.रघुनाथ सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर बी.एच.सहजराव, प्रा.किरण सोनटक्के, प्रा.तुकाराम साठे, एन.आय.काळे, प्रा.पी.एस. खिल्लारे, प्रशांत सोनुने, मन्साराव पवार, वामन वळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.प्रतिमा परदेशी म्हणाल्या की, ब.मो. पुरंदरेंना दिलेला पद्मविभूषण पुरस्कार सत्ताधिशांच्या मनमानीचा पुरावा होय, असे मत व्यक्त करून ब.मो. पुरंदरेच्या पद्मविभूषण पुरस्काराचा निषेध केला. ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करीत असल्याचे प्रतिपादन केले व प्रसार माध्यमांनी सत्याधिशांनी खुश मस्करी करण्यापेक्षा लोकवेदना उजागर करून वास्तवाशी नाते निर्माण करावे, अशा भावना व्यक्त केल्या.
सर्वधर्मीय फुले शाहु आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रा.प्रतिमा परदेशी यांना सम्यक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाळ भीमराव चित्रपटाच्या निर्मात्या निशा भगत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आदर्श जयंती मंडळ व विधायक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांना सर्वधर्मीय जयंती महोत्सवाच्या वतीने गौरविण्यात आले. प्रास्ताविक डॉ.विठ्ठल घुले यांनी केले. यशवंत मकरंद यांनी सूत्रसंचालन केले. रवी पंडित यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजीव अढागळे, नामदेव लहाडे, समीर रोडे, सुभाष जोगदंड, रवी पंडित, सुनील ढवळे, दीपक पंचांगे, विनय मकरंद, परमेश्वर जवादे, विठ्ठल रणबावरे, सम्राट साळवे यांनी पुढाकार घेतला.