मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरी गडावर जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी गडावरुन उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करु शकतात असे संकेत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाचा दौरा आहे. याशिवाय उद्धव ठाकरे एकवीरा देवीच्या दर्शनालाही जाणार आहेत.
शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, शिवाय कुलदैवत एकवीरेचंही दर्शन घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार उद्धव ठाकरे हा दौरा करणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसप्रणित महाविकास आघाडीच्या महत्त्वाकांक्षी सरसकट शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी लागणार आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना लवकरच भरीव मदत देणार असल्याचं जाहीर केलं होतं. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर लवकरच भरीव मदत करण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असून त्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना व त्यांच्या अंमलबजावणीचा वास्तववादी लेखाजोखा मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही हा निधी कर्जरूपानेच उभारावा लागणार असल्याने सुमारे पावणेपाच लाख कोटी रुपये कर्जाचा बोजा मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे.
Visit : bahujannama.com