मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नालेसफाईच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत मनसेच्या एका पदाधिका-याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथे ही घटना घडली आहे. दरम्यान, मेघवाडी पोलिसांनी हाणामारी करणाऱ्या मनसे आणि शिवेसनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
प्रवीण मर्गज असे जखमी मनसे पदाधिका-याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, जोगेश्वरी पूर्वेला असलेल्या प्रभाग 73 मधील शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे यांच्या घराशेजारील मजास नाल्याचे साफसफाईचे काम सुरू होते. तेथे मनसेचे उपाध्यक्ष प्रवीण मर्गज यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी त्याठिका उपस्थित असलेल्या कंत्राटदाराला विचारणा केली. त्याच वेळी त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक शिंदे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आले. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि काही वेळातच या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीपर्यंत गेले. मेघवाडी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजीव पिपळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाणामारीत मनसेचे नेते प्रविण मर्गज यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. हे भांडण आणखी वाढू नये यासाठी घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.