भिवंडी : बहुजननामा ऑनलाइन टीम – न्यायालयात एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान आरोपी व फिर्यादीचे वकील युक्तिवाद करताना दोघांत न्यायाधीशांसमोरच हाणामारी झाली. भिवंडी न्यायालयात रविवारी (दि. 31) दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वाहिनीच्या पत्रकारालाही वकिलाने मारहाण करीत धमकी दिली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या पत्रकारानेही शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
भिवंडी न्यायालयात आपली बाजू मांडताना ॲड. शैलेश गायकवाड आणि ॲड. अमोल कांबळे यांच्यात वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी दोन्ही वकिलांना शांतीनगर पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, ॲड. कांबळे यांनी ॲड. गायकवाड यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच वार्तांकनासाठी पत्रकार गेले होते. त्यावेळी अॅड. गायकवाड हे पोलीस ठाण्यात उभे होते. या घटनेची माहिती पोलिसांकडून एका वृत्तवाहिनीचा पत्रकार घेत होता. त्यावेळी या गोष्टीचा राग आल्याने गायकवाड यांनी त्या पत्रकारास शिवीगाळ केली. बातमी दिल्यास पाहून घेईन असे धमकावत मारहाण केली.