नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसाममध्ये एका महिलेसाठी आडनाव डोकेदुखी ठरले आहे. यामुळे तिचा नोकरीचा अर्जही नाकारण्यात आला आहे. संबंधित महिलेचे नाव प्रियंका असून ती गुवाहाटीची रहिवासी आहे. प्रियंका ‘नेशल सीड कॉर्पोरेशन लिमिटेड’ या सरकारी कंपनीत नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रयत्न करत होती. पण, आडनाव चुतिया असल्याने वेबसाइट आणि सॉफ्टवेअरकडून तिचा अर्ज वारंवार रिजेक्ट केला जात होता. प्रियंकाने अनेकदा प्रयत्न केले पण सॉफ्टवेअर तिचे आडनाव रिजेक्ट करुन ‘योग्य शब्दाचा वापर करावा’ असा एरर दाखवत होते. अखेर प्रियंकाने याबाबत फेसबुकवर संताप व्यक्त केला.
नेशल सीड कॉर्पोरेशन लिमिटेडसारखी मोठी सरकारी कंपनी वारंवार माझा नोकरीचा अर्ज वारंवार नाकारतेय आणि कारण काय तर माझे आडनाव आहे. मला वाईट वाटते की , आता सगळ्यांना सांगून मी थकले आहे. माझे आडनाव कोणता अपशब्द नाहीयेतर तो आमच्याकडे समाज आहे, अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली. यासोबतच प्रियंकाने आपल्या समाजातील लोकांना सोशल मीडियावर नको त्या विषयांवर बोलण्यापेक्षा या मुद्द्याला वाचा फोडण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, प्रियंकाने एनएसीलला सविस्तर ई-मेल पाठवून सॉफ्टवेअरकडून आडनावामुळे अर्ज रिजेक्ट होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तिचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. सॉफ्टवेअरचे कोडिंग आपोआप काही अपशब्द फिल्टर करतात, त्यामुळे प्रियंकाचा अर्ज स्वीकारला जात नव्हता, असे एनएसीएलकडून सांगण्यात आले. प्रियंकाच्या पोस्टनुसार, आसाममध्ये चुतिया नावाचा समाज आहे. ज्याचा उच्चार सुतिया असा होतो.