नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनानंतर चीनमधील एका शहरामध्ये ब्यूबॉनिक प्लेगचे दोन नवीन संक्षयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने हाय अलर्ट जारी केला आहे. प्राण्यांमधून मानवामध्ये या आजाराचा सहज संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच भविष्यात अशी आणखीन काही रुग्ण आढळण्याची शक्यता असल्यानेच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चीनमधील सरकारी वृत्तपत्र असणार्या पीपल्स डेलीच्या वृत्तानुसार, मंगोलियाच्या स्वायत्त क्षेत्रातील बयन्नुरमध्ये ब्यूबॉनिक प्लेगवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिसर्या स्तरावरील इशारा दिला आहे. ब्यूबानिक प्लेगचे दोन रुग्ण बयन्नुरमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी जारी केलेला सतर्कतेचा इशारा हा 2020 च्या शेवटपर्यंत लागू राहणार आहे. सध्या शहरामध्ये प्लेगचा संसर्ग होण्याची भिती आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी जतनतेने जागृक राहणे गरजेचे आहे.
नागरिकांनी स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. तसेच आरोग्यासंदर्भातील काही तक्रारी असल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राला भेट देणे आवश्यक आहे . असं बयन्नुरमधील आरोग्य अधिकार्यांनी म्हटले आहे. सरकारी वृत्तसंस्थेने 1 जुलै रोजी दिलेल्या वृत्तामध्ये पश्चिम मंगोलियाच्या खोड प्रांतामध्ये ब्यूबानिक प्लेगचे दोन रुग्ण आढळून आल्याचे नमूद करण्यात आले होते. या रुग्णांना झालेला संसर्ग हा ब्यूबानिक प्लेगचाचा असल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यानंतर स्पष्ट झाले आहे.