नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दहशतवादाच्या मुद्यावर चीन आणि सौदी अरेबियाही पाकिस्तानला घेरण्यासाठी भारतासोबत आले आहेत. जूनमध्ये फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या बैठकीपूर्वी चीन आणि सौदी यांनी पाकिस्तानला दहशतवादाविरोधात कारवाई करावी आणि निधी थांबवण्याचा जोरदार संदेश दिला. दोन्ही देशांनी पाकिस्तानला सर्व दहशतवादी संघटनांवर कारवाईसह एफएटीएफने दिलेल्या मुदतीच्या आत दहशतवादासंबंधीची आश्वासने पूर्ण करण्यास सांगितले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालात राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, पाकिस्तानला एफएटीएफच्या काळ्या यादीत टाकण्यापासून वाचविण्यासाठी तुर्की शेवटपर्यंत ठाम होती. तर चीनच्या घेतलेल्या भूमिकेला मोठा यू टर्न असे म्हटले जाऊ शकते. कारण त्याने फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या मिटींगमध्ये पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा दर्शविला आहे.
या अहवालानुसार हे निश्चित आहे की सध्याच्या काळात पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये राहील आणि जून महिन्यापूर्वी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. एफएटीएफ गुरुवारी पाकिस्तानला काळ्या सूचीत टाकण्यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे.
गेल्या वर्षी महाबलीपुरमच्या अनौपचारिक शिखर परिषदेच्या वेळी, परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादाचा धोका दोन्ही देशांसाठी कायम आहे याची चिंता वाटत आहे. पीएम मोदी आणि शी जिनपिंग यांनी निवेदनात म्हटले होते की “मोठा आणि वैविध्यपूर्ण देश म्हणून आम्ही सुनिश्चित करू की दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण आणि वित्तपुरवठ्यावर आंतरराष्ट्रीय समुदाय कडक कारवाई करेल “