नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया तसेच मनी लाँडरिंग घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे जेष्ठ नेते तसेच माजी केंद्रीय मंत्री पी . चिदंबरम यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’) कारवाई करण्यात आली .याप्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी दाखल केलेली याचिका दिल्ली न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम हे बेपत्ता झाले आहेत. त्यांचा मोबाईल देखील बंद असल्याचे समजले आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’) पथक त्यांचा शोध घेत होते. जमील फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊनही चिदंबरम यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज बुधवारी सुनावणी होणार आहे.
आयएनएक्स मीडिया आणि मनी लाँडरिंग घोटाळा प्रकरणात चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील गौर यांनी २५ जानेवारी रोजी निकाल राखून ठेवल्यानंतर मंगळवारी त्यांनी ही याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे पी. चिदंबरम आणि त्यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अभिषेक मनू सिंघवी आणि सलमान खुर्शीद या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांशीही चिदंबरम यांनी चर्चा केली.परंतु न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी कपिल सिब्बल यांना चिदंबरम यांची जामीन याचिका बुधवारी ज्येष्ठ न्यायाधीशांपुढे दाखल करण्याचे निर्देश दिले. चिदंबरम यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात आज, बुधवारी घेतला जाईल.
सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितल्याप्रमाणे , ‘ घोटाळ्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी चिदंबरम टाळाटाळ करत असून त्यांना ताब्यात घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना अटकेपासून अंतिम दिलासा दिला होता. परंतु, न्यायमूर्ती सुनील गौर यांनी मंगळवारी त्यांची अटकपूर्व जामिनासाठीची याचिका फेटाळून लावली. न्या. गौर म्हंटले कि, ‘यासारख्या प्रचंड आर्थिक गुन्ह्यात सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाचे हात बांधता येणार नाहीत. आर्थिक गुन्ह्यांना कठोरपणे हाताळण्याची गरज आहे, तसेच या प्रकरणात चिदंबरम हेच सूत्रधार असल्याचेही दिसत आहे’.
न्या. सुनील गौर दोन दिवसांनंतर निवृत्त होत आहेत. चार वर्षांपूर्वी न्या. गौर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी याचिका फेटाळल्या होत्या, तर गेल्या वर्षी न्या. गौर यांनी नॅशनल हेरॉल्डची इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयीन आदेशानंतर चिदंबरम यांना अटक करण्यासाठी सीबीआय अधिकारी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पण, त्यांचा मोबाइल फोन बंद असल्याचे सांगत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याची बातमी कळली, तेव्हा पी. चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात वकिलांसोबत होते. मात्र न्यायालयाच्या आदेशावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले.