लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच महिन्यांपूर्वी आग्रा येथील मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा केली होती. या निर्णयाचे अनेकांनी स्वागतही केले होते. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत लवकरच तुमची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार उदयनराजेंनी शनिवारी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट घेत मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नावर दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
फेसबुकवर पोस्टद्वारे उदयनराजेंनी सांगितले की, आग्रा येथे मुघल संग्रहालयला छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव दिल्ल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनौ येथे मुख्यमंत्री निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज या नात्याने भेट घेऊन त्त्यांना राजमुद्रा भेट देवून आभार मानले. तसेच सातारा आणि प्रतापगडाला भेट देण्याचे खास निमंत्रण दिले. त्यावर आदित्यनाथ यांनी सातारा येथे आल्याची आठवण सांगत प्रतापगडाला भेट देणार असल्याचे सांगितले. गडावरील भवानी मातेची पूजा करून अफझल खानाला याच मातीत गाडल्याचा इतिहास प्रत्यक्ष जाणून घेण्यायचा आहे असेही आदित्यनाथ म्हणाले.
आग्रा येथे मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या नात्याने राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले.@myogiadityanath pic.twitter.com/mco2Neqknl
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 6, 2021
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, पहिल्यांदाच तुमच्या सारख्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे संग्रहालय बनवून महाराजांच्या पराक्रमाचा मोठा गौरव करत त्यांचा इतिहास जगापुढे आणण्याचा प्रयत्न आदित्यनाथ यांनी केला आहे. त्याबाद्दल आम्ही आमच्या घराण्याच्यावतीने आपले आभार मानतो.
महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून शिवसेनेसह अनेक राजकिय पक्षानी आपलं राजकिय अस्तित्व निर्माण केलं. महाराष्ट्रात त्याच शिवसेनेला महाराजांच्या कितीर्ला साजेसं असं स्मारक उभारता आलं नाही. मात्र उत्तरप्रदेशात संग्रहालयाच्या रुपाने राष्ट्रीय स्मारक उभारल्याचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, दस्तऐवजाच्या प्रतिकृती घराण्याच्यावतीने संग्रहालयासाठी आम्ही देऊ असेही उदयनराजेंनी आदित्यनाथ यांना सांगितले.
योगी आदित्यनाथ म्हणाले, अखंड हिंदूस्तानाचे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपुरूष आहेत. त्यांच्या शौयार्ला आणि पराक्रमाला संपूर्ण जगात तोड नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून देशाला गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे मुघली गुलामी मानसिकतेच्या प्रतिकाला या उत्तर प्रदेशात स्थान नाही. त्यासाठीच आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. या संग्रहालयच्या माध्यमातून मांडला जाणारा मराठा साम्राजाचा इतिहास केवळ राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरणादायी असेल.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मी निस्सिम भक्त असून त्यांच्या स्वराजातून आजही आम्हाला मोठी प्रेरणा मिळत आहे. त्यांच्यासारख्या राष्ट्रपुरूषांचा इतिहास जगापुढे आणला पाहिजे असे सांगत आदित्यनाथ म्हणाले, ताजमहालच्या गेटपासून अवघ्या दीड किमीं अंतरावर २०० कोटींचे हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्यार्ची सुटका हा इतिहास मांडण्यात येणार आहे. या संग्रहालयाच्या उभारणीसाठी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजाची आग्र्याहून सुटका या घटनेचा इतिहास शोधण्यासाठी पुरावे जमा करण्यात आले आहेत. या संग्रहालयाचे भूमिपूजन जानेवारी २०१६ मध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.