रायगड : बहुजननामा ऑनलाईन – रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६वा शिवराज्यभिषेक सोहळा आज (६ जूनला) स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगड किल्ल्यावर आले आहेत.
हा शिवराज्यभिषेक सोहळा आज रायगड किल्ल्यावर संपन्न होत आहे. या सोहळ्याला खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले तसेच पाच देशाचे राजदूत यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्यावर राजसदरेवर फुलांची आरास, मंडप, रांगोळी याची जोरदार तयारी केली आहे.तर होळीच्या माळरानावर मैदानी कवायतीचे खेळ उपस्थितांसमोर सुरू झाले आहेत. शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यातून तसेच बाहेरून लाखोंच्या संख्येने शिवभक्त गडावर आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.