कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नर्सरीबाग येथे स्मारक उभारले जात आहे. या स्मारकासाठी जिल्ह्यातील विविध भागातून मृदा संकलन केली जात आहे. ज्या ठिकाणी शाहू महाराजांचा पदस्पर्श झाला आहे, अशा सर्व जागेवरची माती संकलन करण्यात आली आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर हा कार्यक्रम झाला.
मृदा संकलनाची जबाबदारी समितीचे सदस्य वसंतराव मुळीक व इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या सदस्यांनी आतापर्यंत कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ, मुंबई येथील पन्हाळा लॉज, जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, माणगाव परिषद, अंबाबाई मंदिर परिसर, राधानगरी तलाव आदी ठिकाणची मृदा संकलित केली आहे.
कोल्हापूर महापालिकेतर्फे स्वनिधीतून राजर्षी शाहू महाराज यांची समाधी नर्सरी बागेत बांधली जात आहे. या ठिकाणी मेघडंबरीचे काम पूर्ण झाले आहे. तर आजूबाजूची संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. शाहू महाराज यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांची राख विसर्जित करण्यात आली होती. या समाधीच्या चौथऱ्यावर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणची माती दगड पेटीत ठेवण्याचा निर्णय समाधी समितीने घेतला आहे.