Chhatrapati Sambhajinagar Crime News | लग्नाचा तगादा, प्रेयसीचा गळा आवळून खून, मुंडके व डावा हात कापून पिशवीत भरला; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Chhatrapati Sambhajinagar Crime News | Marriage pressure, lover strangled to death, head and left hand cut off and stuffed in a bag; Accused sentenced to life imprisonment
May 9, 2025

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Crime News |  लग्नाचा तगादा लावलेल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस सीन्हा  यांनी जन्मठेप त्यासोबतच ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सौरभ खंडू लाखे (वय ३१,  रा-शिऊर ता-वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, सौरभ लाखे याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याचे आणि त्याच्या प्रेयसीचेही दुसऱ्याशी लग्न झाले होते. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. काही दिवसानंतर संबंधित तरुणीने सौरभकडे लग्नाची मागणी केली. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. दरम्यान १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सौरभ व त्याच्या काही मित्रांनी तरुणीच्या घरी जाऊन तिचा खून केला. त्यानंतर आरोपी सौरभने तोंडाला रुमाल बांधून घराला कुलूप लावून पळ काढला. १६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी सौरभ पुन्हा तरुणीच्या घरी आला. तरुणीचे मुंडके व डावा हात कापून पिशवीत भरला.

शरीराचे तुकडे असलेले पिशवी घेऊन सौरभ एमएच २० ९६४८ या क्रमांकाच्या दुचाकीने निघून गेला. सौरभने फर्निचरच्या गोडाऊनमध्ये जाऊन पिशवी लपवली. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी सौरभ व त्याचा साथीदार पुन्हा कारने तरुणीच्या घरी गेला. घरात ठेवलेले मुंडके व हात नसलेले धड कारमध्ये टाकून घेऊन जात होते. दरम्यान नाकाबंदी सुरू असताना देवगाव रंगारीच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली.

खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी २८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात मृताची मैत्रिण, इमारतीतील दोन भाडेकरू, सीसीटीव्ही फुटेज, डॉक्टर व पंचांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने सौरभ लाखे याला दोषी ठरवून भादवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप व २५ हजारांचा दंड, कलम २०१ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात दोन आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.