Chhagan Bhujbal On Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळांचे भाष्य; म्हणाले, “गुन्हा सिद्ध होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा का द्यावा? “

मुंबई: Chhagan Bhujbal On Dhananjay Munde | सरपंच संतोष देशमुख प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. माजी खासदार संभाजीराजे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार बजरंग सोनावणे, भाजपाचे आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि ज्योती मेटे यांनी राज्यपालांची भेट घेतली.
बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण असल्याचे शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले. पोलिसांच्या कथित निष्काळजीपणा आणि पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे शिष्टमंडळाने म्हटले आहे.
दरम्यान सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य असल्याचे म्हंटले आहे. भुजबळ यांनी मुंडे यांचे समर्थन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ” संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषी असेल त्याला फाशी द्या. गुन्हा सिद्ध होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा का द्यावा? धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणं योग्य वाटत नाही. मंत्रिपद काही सहज मिळत नाही. कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्री व्हायचं नाही. चौकशीत काहीच समोर आलं नाही, मग राजीनामा का मागता?”
ते पुढे म्हणाले, ” कुणाची बाजू घ्यायची नाही. चौकशी पूर्ण होऊ द्या, एवढेच म्हणणं आहे. निरपराधाला शिक्षा होऊ नये, असे कायदा सांगतो. बीड प्रकरणात दोषींवर कारवाई होणार आहे. संतोष देशमुख यांचा निर्घृण खून झाला. खून कसा झाला हे आमदार धस यांनी सांगितले तेव्हा अंगावर शहारे आले होते”, असे भुजबळ यांनी म्हंटले.
Comments are closed.