Chesta Bishnoi Death | पुणे: 9 दिवसांची झुंज अखेर अपयशी ! 21 वर्षीय चेष्टा बिश्नोईचे पायलट होण्याचे स्वप्न अपघाताने संपवले

December 18, 2024

पुणे : Chesta Bishnoi Death | इंदापूर तालुक्यातील लांमजेवाडीजवळ झालेल्या कारच्या भीषण अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यु झाला. त्यांचे सहकारी असलेली तरुणी गेले ९ दिवस मृत्युशी झुंज देत होती. तिच्या मेंदुला झालेल्या दुखापतीमुळे ती गंभीर होती. अखेर मंगळवारी सकाळी १० वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. (Trainee Pilots Death In Pune)

चेष्टा बिश्नोई (वय २१) असे मृत्यु पावलेल्या शिकाऊ पायलट तरुणीचे नाव आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे.
बारामती येथील रेड बर्ड फ्लाइंग अ‍ॅकेडमीचे चार विद्यार्थी ९ डिसेंबर रोजी पहाटे टाटा हॅरिअर या कार बारामतीकडून भिगवणकडे निघाले होते. कृष्णा मंगल सिंग हा गाडी चालवत होता. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लांमजेवाडीजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी बारामती एमआयडीसीला पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनवर जाऊन पलटी झाली. त्यात दशु शर्मा (वय २१) आणि आदित्य कणसे (वय २९) यांचा जागीच मृत्यु झाला़ तर कृष्णा मंगलसिंग (वय २१) आणि चेष्टा बिश्नोई (वय २१) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. चेष्टा बिश्नोई हिच्यावर रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार करण्यात येत होते. मंगळवारी सकाळी तिची जीवनयात्रा थांबली.