चंदीगढ : वृत्तसंस्था – चंदीगढ मध्ये आज (शनिवार) संध्याकाळी आग लागण्याची घटना घडली असून शहराच्या सेक्टर ३२ डी येथे एका घरात मुलींच्या पीजी हाऊसला ही आग लागली आहे. यात तीन मुली जिवंत जाळल्या असून दोन मुलींची स्थिती गंभीर आहे. एका मुलीने पहिल्या मजल्यावर असणाऱ्या गेस्ट हाऊसच्या छतावरून उडी मारत आपला जीव वाचवला असून ती पण जखमी झाली आहे. या घटनेत मारल्या गेलेल्या मुलींची नावे रिया, पंछी आणि मुस्कान अशी असल्याचे समजते आहे. यातील दोघीजणी पंजाबच्या आणि एक हरियाणाची राहणारी आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून पोलिसांनी परिसर घेरला आहे.
अचानक पीजीमध्ये धूर लोळ उठत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथील लोकांनी पोलिसांना याची खबर दिली. फायर ब्रिगेडने वेळेवर येऊन आग विझवण्याचे काम सुरु केले. आत गेल्यावर पाचही मुली जळालेल्या अवस्थेत तिथे पडल्या होत्या, असे सांगितले जात आहे. त्यांना जीएमसीएच ३२ रुग्णालयात त्यांना नेले आहे. पण उपचारादरम्यान तीन मुलींचा मृत्यू झाला. तर दोन मुलींची स्थिती अजूनही गंभीर आहे. यांचे वय १८ ते २२ दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.
पीजीमध्ये जवळजवळ २५ मुलींना राहण्यासाठी जागा असताना तेथे चार-पाच मुलीच राहत होत्या. आग लागण्याचे कारण अद्याप समजले नसून ही पीजी रजिस्टर्ड नसल्याचेही सांगितले जात आहे. हे पीजी हाऊस बेकायदेशीरपणे चालवली जात होती.