Chakan Pune Crime | पिंपरी : मन सुन्न करणारी घटना! मुलाला करंट लागला अन् आई मदतीला धावली, दोघांचाही मृत्यू; चाकण परिसरातील दुर्दैवी घटना

June 12, 2024

पिंपरी :  – Chakan Pune Crime | विजेचा करंट लागल्याने आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना चाकण परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.11) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खराबवाडी येथे घडली आहे. मुलाला विजेचा करंट लागल्याचे पाहून आई त्याला वाचवण्यासाठी धावली आणि ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे खराबवाडी (Kharabwadi) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पल्लवी जाजू असे आई तर समर्थ जाजू (वय 15) असे मृत्यू झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणमधील खराबवाडी येथे जाजू कुटुंब राहत. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आई टेरेसवर स्वच्छता करण्यासाठी गेली होती. तर, मुलगाही टेरेसवर गेला होता. जिन्यातून पाणी आत येऊ नये म्हणून करण्यात आलेल्या छताच्या पत्रात विद्युत प्रवाह उतरला होता. तिथंच लोखंडी अँगलमधून तार लोंबकळत होती. त्यातही विद्युत प्रवाह उतरला होता.

पत्र्याच्या संपर्कात आल्याने मुलगा समर्थ याला विजेचा शॉक लागला. मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहून आई मुलाला वाचवण्यासाठी धावली असता तिलाही विजेचा शॉक बसला. यामध्ये 15 वर्षीय समर्थ आणि त्याची आई पल्लवी जाजु यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.